मुंबई, २९ मे — अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते आणि अस्वच्छ अन्न उत्पादकांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. २५ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ तीन दिवसांत राज्यभरात ५३ धाडी टाकत ३३ जणांना अटक करण्यात आली असून २७ आस्थापनांवर सील ठोकण्यात आले आहे.
FDA च्या माहितीनुसार, मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये एकाचवेळी धडक कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरोधातील मोहिमेत ५३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ ठिकाणी बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे आढळून आले. याप्रकरणी २५ FIR दाखल करण्यात आले असून ५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या कारवाईदरम्यान सुमारे ₹२०.५७ लाखांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. मुंबई विभागात सर्वाधिक कारवाई झाली असून १९ आस्थापना सील करण्यात आल्या आणि १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
याशिवाय अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (FSSA) २३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट्स, फरसाण, आईस्क्रीम, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी पदार्थांचा सुमारे ₹२८.७८ लाख किमतीचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला असून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
राज्यातील विविध भागांमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. जळगाव जिल्ह्यात गायीच्या दुधात खाद्यतेल मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे आढळले. पुण्यात इथिलीन रसायनांचा वापर करून आंबे कृत्रिमरीत्या पिकवले जात असल्याचे समोर आले. धुळे येथे अस्वच्छ वातावरणात मटर बेसन तयार केले जात असल्याचे आढळून आले, तर मुंबईतील धारावी परिसरात नियमबाह्य लेबलिंगसह नूडल्स उत्पादनावर कारवाई करण्यात आली. नाशिकमध्ये परवाना नसताना खाद्यपदार्थ उत्पादन आणि बनावट लेबलिंग प्रकरणे समोर आली असून पालघरमध्ये अस्वच्छ परिस्थितीत आईस्क्रीम उत्पादन करणाऱ्या युनिटवरही कारवाई करण्यात आली.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनाला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. तसेच भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, FDA मध्ये तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर प्रत्यक्ष मैदानात उतरून करण्यात येत असलेल्या या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अन्न सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा भर दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

