आमच्या आई ‘भालेराव बाई ‘
प्रतिभा प्रभाकर भालेराव मॅडम
आजही आईंची ओळख आहे ती शाळेमुळेच आणि शाळाही ओळखली जाते ती भालेराव बाईंची शाळा म्हणूनच. शाळा व आई एकाच नाण्याच्या दोन बाजू. कधीही एकमेकापासून वेगळ्या न करता येण्यासारख्या.
१९६६ साली गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुरु करण्यात आलेल्या शाळेला प्रगतीपथावर नेण्यासाठी आईंनी उपसलेल्या कष्टांना पतीराज प्रभाकरांनी तितक्याच तोलामोलाची साथ दिली. नोकरी, एकत्रित कुटुंब] लहान भावंडांचा सांभाळ] शिक्षण, आई गेल्यामुळे समर्थपणे सांभाळले.
ती. दादा-आईंची जिद्द, मेहनत, आत्मविश्वास, पडेल ते काम करण्याची मानसिक तयारी यामुळे शाळेच्या इमारतीसाठी मिळवलेली पाठारे मैदानाची जागा, त्यासाठी प्रस्थापितां विरुद्ध दिलेला १० वर्षांचा लढा म्हणजे रोम हर्षक संग्रामक!
आईंची संस्थापिका, संचालिका, मुख्याध्यापिका, संस्थेच्या अध्यक्षा या नात्याने शाळेची प्रगतीपथावरील वाटचाल स्पर्धेच्या युगात यशस्वी ठरली.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील समशेरपूर या छोटयाशा खेड्यात १९३७ साली त्यांचा जन्म. पूर्वाश्रमीची लीला पंढरीनाथ जोशी. घरात एकूण सात भावंडे. अतिशय गरीब हलाखीची परिस्थिती. शिक्षण घेण्यास अत्यंत प्रतिकूल. या भावंडांचे शिक्षण व लीलाचेही फायनल, मॅट्रिक, एस. टी सी. पर्यंत शिक्षण नाशिक पुण्याच्या नातेवाईकांकडे राहून झाले. स्वातंत्र्य चळवळीत भावांना तुरूंगवास, कै. दाजीकाका ही स्वा. सावरकरांबरोबर अंदमानात.
१९५७ साली लीलाचा विवाह कल्याणस्थित श्री. प्रभाकर भालेराव यांच्याशी झाला. लीलाची प्रतिभा झाली. सासरे, दीर, नणंदा असे एकत्र कुटूंब. अशात प्रतिभाने वेळ काढून शिवणकाम, भरतकाम, हस्तकला, कोर्समध्ये निपुणता मिळवली.
दिवसा मासांनी १९६४ पर्यंत प्रतिभा प्रभाकर या दांपत्याला तीन मुले झाली. मुलांना शाळेत ने-आण करणे, घरातील व्याप संभाळणे, यातून ‘आपणच का शाळा सुरु करू नये ?’ या विचाराला श्री. प्र. र. भालेराव यांनी तात्काळ पाठिंबा दिला. ती. सासरे व घरमालक यांनीही घरात शाळा भरवण्याची परवानगी दिली. ‘शिशु-विहार‘ पू. प्राथमिक शाळा असा फलक राहत्या घरावर लावला. गुढीपाडवा मुहूर्त साधून सरस्वतीला हार घातला. ३/४/२० विधार्थी वाढत शाळा आकाराला आली.
मध्यंतरीच्या काळात आईंनी डी. एड., पंडीत, पी. टी. इत्यादीं परीक्षा दिल्या. संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्यावरील अपार श्रध्दा यांची कास धरून शालेय मार्गक्रमणा सुरु झाली ती आजतागायत. रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव करून हीरक महोत्सवासाठी तयारी चालू आहे. ध्येयासक्त, ध्येयनिष्ठ, ध्येयवेडया प्रतिभाताईंसारख्या शिक्षिकेसोबत कामाला लागलेले सर्व अध्यापक, सेवक तळमळीने झटणारे निघाले. स्कॉलरशिप, गणित,हिंदी, चित्रकला, परीक्षांचे निकाल चांगलेच लागू लागले. इ. १० वी रिझल्टही ९७ ते १०० टक्के लागत आहे. त्यामुळे शाळेचा लौकिक वाढत आहे. शाळेचे नाव शिशु-विहार बदलून श्री गजानन विद्यालय ठेवले आहे. एस. एस. सी. बोर्डातही वरच्या नंबरने आली आहेत.
विशेष म्हणजे शाळेतील ७ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार‘ मिळाले आहेत. शाळेलाही “आदर्श शाळा” पुरस्कार मिळाला आहे. स्काऊटचे शिक्षण देत असताना स्काऊट तर्फे “आंतरराष्ट्रीय सद्दिच्छा ” योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, सिक्कीम राज्यांना भेट देऊन त्यांची सर्व माहिती प्रतिभाताईंनी पेपरमध्ये दिली, सांगितली. आईंना डोंगरमाथा, सहलीची आवड असल्यामुळे ४२ दिवस “कैलास मानस ” यात्रा पायी केली; त्यावर अनेक व्याखाने झाली. त्यांनी निवृत्त झाल्यानंतर नातवांच्या उच्च शिक्षणासाठी १४ वर्षे पुण्यात वास्तव केले तरी शाळेसाठी कल्याण वारी असेच पुण्यात असताना पंढरपूर वारी सफल झाली. तसे आईंचे काका कै. दाजी ना. जोशी यांच्या दर्शनासाठी अंदमानला जाऊन स्वा. सावरकरांचेही इतिवृत्त समजले पहिले. डोळे भरून आले. नमन केले.
पुणे येथे ‘निसर्ग सेवक ‘ संस्थेतर्फे शाळातून पर्यावरण विषयक कामे केली. विश्व हिंदू परिषदेच्या दोन बालवाडयांना सक्रिय मार्गदर्शन केले. घरात ३ ते १२ वर्षांच्या मुलांचे संस्कार वर्ग घेतले. महिलांसाठी ‘शुभं करोति‘ वर्ग चालविला. रामदासी मंडळाने त्याची दखल घेतली. मुलांचे कौतुक केले. महाराष्ट्र राज्य बाल शिक्षण परिषद पुणे १ वर्ष अध्यक्ष म्हणून काम,केले. पंढरपूर यात्रा केली. दोन नातू अमेरिकेत असल्याने ‘नायगरा ‘ धबधबा पाहण्याचा योग आला.
कल्याण येथील याज्ञवल्क संस्थेत ५ वर्षे महिला अध्यक्ष म्हणून काम केले. प्रौढ शिक्षण वर्ग २ वर्षे चालविला. गुजराथी बालवाडी ८ वर्षे चालविली. ठाणे जिल्हा खा. प्राथ. शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कामे केले.
वाचणे, लिहिणे हा त्यांचा छंद. १) कैलास मानस यात्रा प्रवास वर्णन २) श्री गजानन विजय ग्रंथसार ३) योग वशिष्ठातील स्त्रीरूपे ४) पंचकन्यांचा दिपत्कार ५) अंदमानच्या स्मृती लहरी ६) पंचदिव्यांग नातीचा दीपत्कार ७) संचित संकीर्तन ८)शुभेच्छांचे प्राजक्त ९) शाळेसाठी इशस्तवने १०) पंढरपूर यात्रा दर्शन ११) मुलांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा सुमने १११ १२) मर्म बंधातील शाळा १३) स्वतःच्या ६१ निमित्त नातवंडांना ६१ शुभेच्छा पत्रे त्यात मोठ्या नातवास गीतेवर २१ पत्रे. त्याचे संकलन १४) स्फुट लेखन, पेपर व दिवाळी अंकात १५) ७५ व्या वर्षी ७५ सुविचार दर्शन संकलन.
प्रतिभा आईंची मुलेही हुशार निघाली. शिरीष बी. एस. सी. / एम. बी. ए., पत्नी एल. एल. एम. शशांक इंजिनियर, पत्नी एम. ए. क्यू . / कल्पना डॉ. जावई डॉक्टर. कोरोनाने शशांकला गिळले आणि सर्वांना दुःख सागरात ढकलले.
आईचं वय आता ८७ वर्षे. त्या प्रसंगानुरूप शाळेत जातात. जातीने सर्व पाहतात. पण त्यांची मुले सुना नातवंडे, नातेवाईक त्यांना शाळेत जाण्यास मनाई करतात तेव्हा त्या म्हणतात:
शाळा माझा धर्म ! शाळा माझे कर्म
शाळा मर्म माझ्या जीवनातले !!
शाळा सूर माझा ! शाळा स्वर माझा
शाळा ताल ठेका ! माझ्या जीवनातले !!
शाळा काव्य माझे ! शाळा श्राव्य माझे
शाळा हव्य माझे ! जीवनातले !!
शाळा राम माझा ! शाळा नाम माझा
शाळा धाम माझ्या ! जीवनातले
शाळा सोडून मी कशी राहू ?
त्यांना मिळालेले पुरस्कार सन्मान
* पंचायत समिती कल्याण – उत्कृष्ट शिक्षक – १९८२
* रोटरी क्लब कल्याण – विशेष आदरणीय शिक्षक – १९८४
* विश्वोद्धार संघ कल्याण – गुणवंत शिक्षक – १९८७
*जायंट्स ग्रुप कल्याण – शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी – १९८९
* जिल्हा परिषद ठाणे – शैक्षाणिक व सामाजिक क्षेत्रात प्रशंसनीय कार्यार्थ गौरव – १९९०
* नाथ जोशी समाज कल्याण – शिक्षक गौरव सन्मान – १९९२
* लायन्स क्लब ऑफ कल्याण – शिक्षक सन्मान पुरस्कार – १९९५
* भारत सरकार नवी दिल्ली – अध्यापन क्षेत्र में .प्रशंसनीय लोकसेवा के लिए सन्मानार्थ राष्ट्रीय पुरस्कार – १९९४/९५
* शिवसेना कल्याण, ठाणे – ‘कल्याणरत्न ‘ पुरस्कार – २००३
* संत मुक्ताबाई पुरस्कार पुणे – २००७
* श्री. ना. बनहट्टी पुरस्कार पुणे – पुणे नगर वाचन मंदिर पुणे – २००८
* याज्ञवल्क्य संस्था, कल्याण – सामाजिक व शैक्षणिक कार्याचा उचित सन्मानार्थ सौ. सुशिलाबाई एकलहरे महिला पुरस्कार – २०१०
* मराठी प्रवास वर्णन ‘लेखक वाचक मंच ठाणे सन्मान – २०१२
*दैनिक पुढारी कल्याण – कस्तुरी महिला पुरस्कार – २०१४
*‘वार्तासुत्र‘ साप्ताहिक कल्याण – सथा गौरव सन्मान – २०१४
*पु. ल. कट्टा – गुरुवर्य कृतज्ञता सोहळा – २०१४
*सार्वजनिक गणेश शताब्दी महोत्सव पुरस्कार कल्याण – २०१४
*याज्ञवल्क्य संस्था कल्याण – रौप्प रागिणी पुरस्कार – २०१८
*सा. कल्याण वैभव, कल्याण – विद्या प्रसारण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान – २०२०
*सा. कल्याण वैभव डॉ. रुग्णमित्र मासिक कल्याण – मराठी दिन – लेखन गौरव पदक – २०२२
इतर अनेक संस्था शाळातून आईंना मिळालेली राष्ट्रीय पुरस्काराची रक्कम संस्थेत ठेवून ठाणे जिल्हातील खाजगी प्राथमिक शाळेतील योग्य शिक्षकास ‘शिक्षक भूषण‘ पुरस्कार दिला जातो. शाळेचे माजी विद्यार्थी जे आज सफल व्यावसायिक तसेच शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत वेळात वेळ काढून आईच्या भेटीला येतात, पाय पडून त्यांचे आशीर्वाद घेतात. त्यांना आईच्या शाळेचा सार्थ अभिमान वाटतो तसे ते नेहमी अभिमानाने सांगतात !
आईंनी लावलेल्या शाळारूपी रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि या वटवृक्षाच्या छायेत आज शेकडो, हजारो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी शिक्षण व संस्काराचे बाळकडू मिळते आहे.
– लेखिका
कांचन भालेराव
मुख्याध्यापिका, श्री गजानन विद्यालय, कल्याण