मुंबई, १९ मे — महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. Election Commission of India ने सोमवारी या निवडणुकांची घोषणा केली असून, १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे, तर २२ जूनला मतमोजणी केली जाणार आहे.
या निवडणुकांसोबतच नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणूकही होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधानपरिषदच्या या जागेचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार:
- २५ मे रोजी अधिसूचना जारी होणार
- १ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
- २ जून अर्जांची छाननी
- ४ जून उमेदवारी माघारीची अंतिम मुदत
- १८ जून मतदान
- २२ जून मतमोजणी
असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे या विधान परिषद निवडणुका काही काळ प्रलंबित होत्या. आवश्यक मतदारसंख्या आणि स्थानिक संस्थांची अट पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे.
या निवडणुकांकडे राज्यातील प्रमुख पक्षांचे विशेष लक्ष लागले असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काही मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेमधील संख्याबळाच्या दृष्टीने या निवडणुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

