कल्याण / डोंबिवली, २८ एप्रिल — कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षा प्रवास हा दिवसेंदिवस नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी रिक्षा स्टँडवर रिक्षांचा अक्षरशः शुकशुकाट दिसतो, तर दुसरीकडे अनेक रिक्षा चालक रिकाम्या रिक्षा घेऊन प्रवाशांसमोरून सुसाट निघून जात असल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे.
कामावरून परतणाऱ्या नोकरदार वर्गाला विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत असून, रिक्षा स्टँडवर प्रवाशांची तुडुंब गर्दी असतानाही रिक्षा मिळणे कठीण झाले आहे. अनेक वेळा रिक्षा चालक लहान अंतरासाठी भाडे देणाऱ्या प्रवाशांना नकार देतात आणि जास्त भाडे मिळेल या अपेक्षेने पुढे जातात. काही अंतरावर जाऊन तेच चालक जादा भाड्याने प्रवासी घेऊन जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः महिला प्रवासी आणि कुटुंबांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत आहे. काही घटनांमध्ये प्रवाशांना ३०-४५ मिनिटे रिक्षेसाठी वाट पाहावी लागल्याचे प्रकारही समोर आले असून, यावरून या समस्येची तीव्रता स्पष्ट होते.
दरम्यान, रिक्षा संघटनांनीही या प्रकारांवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, असे गैरप्रकार करणारे अनेक चालक हे अधिकृत संघटनांशी संबंधित नसून बॅज किंवा परवाना नसलेले किंवा नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणारे चालक आहेत. त्यामुळे अशा चालकांवर परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
या समस्येमागे काही कारणेही समोर आली आहेत. सुट्टीच्या हंगामामुळे अनेक रिक्षा चालक आपल्या गावी गेले असल्याने रिक्षांची संख्या कमी झाली आहे. याचा फायदा घेत काही चालक जास्त भाडे मिळवण्यासाठी जाणूनबुजून प्रवाशांना टाळत असल्याचे दिसून येत आहे.
एकूणच, कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र असून, “रिक्षा आहेत पण मिळत नाहीत” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई न केल्यास प्रवाशांची ही ‘वाट’ आणखी कठीण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

