ठाणे, २७ एप्रिल — ठाणेकर आणि मुंबईकरांच्या जिभेवर सात दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध ‘मामलेदार मिसळ’ उपहारगृहाची जुनी वास्तू पुनर्विकासासाठी जमीनदोस्त करण्यात आली आहे. ठाणे तहसील कार्यालय परिसरातील पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात झाल्याने या परिसरातील इतर सरकारी कार्यालयांसह या ऐतिहासिक खाद्यसंस्कृतीचा साक्षीदार असलेली इमारतही पाडण्यात आली. यामुळे ‘एक तिखट… दोन मिडीयम… दोन पाव एक्स्ट्रा’ अशी ऑर्डर देत मिळणाऱ्या ठसकेदार मिसळीचा एक युग संपल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
१९४६ साली नरसिंग मुर्डेश्वर यांनी एका छोट्याशा कॅन्टीनमधून या मिसळीची सुरुवात केली होती. सुरुवातीला सरकारी कामासाठी आणि बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची भूक भागवणारी ही मिसळ पुढे आपल्या चवीमुळे प्रसिद्ध झाली. तहसील कार्यालय परिसरात अधिकारी आणि मामलेदार या मिसळीचा आस्वाद घेत असल्याने कालांतराने तिला ‘मामलेदार मिसळ’ हे नाव प्राप्त झाले आणि ती ठाण्याची ओळख बनली.
या उपहारगृहात लालबुंद तर्री, पिवळ्या बटाट्याची भाजी, कांदा आणि पाव असा साधा पण ठसकेदार मेन्यू खवय्यांच्या मनात घर करून गेला होता. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनीही या मिसळीचा आस्वाद घेत तिचे कौतुक केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसारख्या अनेकांनी या चवीला दाद दिली होती.
नरसिंग मुर्डेश्वर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी ‘मामा’ या नावाने उपहारगृहाची जबाबदारी सांभाळत या मिसळीला ब्रँडमध्ये रूपांतरित केले. मात्र कोरोना काळात त्यांचेही निधन झाले. तरीही, खवय्यांची गर्दी अखेरपर्यंत कायम होती.
दरम्यान, जुनी वास्तू पाडली असली तरी ‘मामलेदार मिसळ’ पूर्णपणे बंद झालेली नाही. हे उपहारगृह सध्या जवळच दुसऱ्या ठिकाणी सुरू असून, पुनर्विकासानंतर नव्या इमारतीत पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती आहे.
एकूणच, ‘मामलेदार मिसळ’ची जुनी वास्तू पाडली गेल्याने ठाण्यातील एक ऐतिहासिक खाद्यपरंपरेचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त होत असली, तरी नव्या रूपात ही चव पुन्हा अनुभवता येणार, यामुळे खवय्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

