कल्याण, १५ एप्रिल — कल्याण–मुरबाड मार्गावरील रायते पुलावर १३ एप्रिल रोजी झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतरही परिसरातील अवैध आणि धोकादायक प्रवासी वाहतूक सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या अपघातात इको टॅक्सी आणि सिमेंट मिक्सर ट्रकची जोरदार धडक झाली होती. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात संबंधित टॅक्सी चालक आणि ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुर्घटनेनंतर नियमांचे काटेकोर पालन होईल, अशी अपेक्षा असतानाच दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच मार्गावर नियमभंग सुरू असल्याचे चित्र दिसून आले. 5+1 आसन क्षमतेच्या इको टॅक्सीत तब्बल 10 ते 11 प्रवासी कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, या दुर्घटनेतून ना वाहनचालकांनी, ना प्रवाशांनी, ना प्रशासनाने कोणताही धडा घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
कल्याण स्टेशन परिसरातून मुरबाड, मानपाडा, मलंगड रोड, भिवंडी आणि पडघा या भागांमध्ये काळी-पिवळी इको टॅक्सी मोठ्या प्रमाणावर चालतात. मात्र, नियमाप्रमाणे 5 प्रवासी आणि 1 चालक अशी क्षमता असताना प्रत्यक्षात 10 प्रवासी आणि 1 चालक असा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे वास्तव आहे. यामुळे पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कुठे आहे? क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यावर कारवाई का होत नाही? असे सवाल आता टॅक्सी चालकांकडूनही उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, वाढती महागाई, सीएनजी दरवाढ आणि वाहनांच्या देखभालीचा खर्च यामुळे कमी प्रवाशांमध्ये व्यवसाय परवडत नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागरिकांना आवाहन करताना स्पष्ट केले की, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणे टाळावे आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे.
मात्र, या सर्व इशाऱ्यांनंतरही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

