ठाणे, २१ मे — ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट परिसरात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोघेजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी आणि महापालिकेच्या सुरक्षारक्षकाचा समावेश असल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
🚨 ठाण्याच्या गावदेवी मार्केटमधील भीषण अग्नितांडवात दोन जणांचा मृत्यू !🔥⚠️
कपड्यांची दुकाने, गोदामे आणि स्टॉल्स आगीत जळून खाक.
अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आग नियंत्रणात आणली.
सविस्तर बातमी :- https://t.co/1IKhQYI1n4#Thane #Fire #GaondeviMarket #BreakingNews pic.twitter.com/j3fFbSwmFb
— Kalyan Vaibhav News (@KalyanVaibhav10) May 21, 2026
या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे :
- काळू शंकर गाडेकर (वय ५३) — ठाणे महानगरपालिका, आरक्षक
- सागर शिंदे (वय ४३) — ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, स्थानक अधिकारी
अशी आहेत.
तर जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये :
- सुजित पष्टे (वय ४५) — ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, स्थानक अधिकारी
- समीर जाधव (वय ४०) — ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, तांडेल
यांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही आग पहाटेच्या सुमारास नौपाडा परिसरातील गावदेवी मार्केटमध्ये लागली. प्राथमिक माहितीनुसार, मार्केट परिसरातील कपड्यांची दुकाने, गोदामे आणि स्टॉल्समध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. परिसरात दाट धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे, गावदेवी मार्केट परिसर हा ठाण्यातील अत्यंत गर्दीचा आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचा भाग मानला जातो. पहाटेच्या वेळेत आग लागल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किट किंवा विद्युत यंत्रणेमधील बिघाडामुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
एकूणच, ठाण्यातील गावदेवी मार्केटमधील या भीषण दुर्घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, व्यापारी संकुलांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

